नवी दिल्ली - गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना लॉकडाऊन दरम्यान कोणताही अडथळा करू नये, असे आदेश दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांनी दिले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस उपायुक्तांना याविषयीचे निर्देश दिले आहेत.
हॉटस्पॉट्समध्ये राहणाऱ्या गर्भवती आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत हेच आदेश पाळले जावेत, असे देव यांनी सांगितले आहे. तसेच, सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वापरली जाणारी 'हेल्पलाइन 1077' गर्भवती महिलांसाठीही काम करेल, असे ते म्हणाले. उपायुक्त (मुख्यालय, महसूल) हे हेल्पलाईनच्या चोवीस तास पूर्णपणे कार्यक्षम राहण्याकडे लक्ष पुरवतील, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
याआधी, दिल्लीतील कोविड -19 मुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मागील 24 तासांत तब्बल 83 ने वाढ झाली आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले होते. उशिरा नोंदवलेल्या 69 मृत्यूंमुळे ही वाढ अचानक दिसून आल्याचे ते म्हणाले.