श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या हंदवाडा दहशतवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. तर, परिसरामध्ये आणखी दहशतवादी लपून असल्याच्या संशयावरून शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
लंगेट येथे बुधवारी मध्यरात्री दहशतवाद्यांनी ३२ राष्ट्रीय रायफल्सच्या पेट्रोलिंग पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. त्यानंतर दहशतवादी आणि भारतीय सेनेमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. त्यानंतर दहशतवादी घटनास्थळावरून पसार झाले होते.
घटनेची माहिती मिळताच सीआरपीएफ घटनास्थळी दाखल झाले आहेत. संपूर्ण परिसराला वेढा देऊन तपास सुरू केला आहे. कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्याची सध्या ओळख पटलेली नाही, असे सुरक्षा दलाच्या सुत्रांचे म्हणणे आहे. ३ दिवसांपूर्वी हंदवाडा येथील बाबागुंड येथे दहशतवादी आणि भारतीय सैनिकांमध्ये ६० तास चकमक झाली होती. त्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या २ दहशतवाद्यांचा खत्मा करण्यात आला. मात्र, या कारवाईत सीआरपीएफच्या एका जवानासोबत भारतीय सैन्याच्या ५ जवानांना वीर मरण आले होते. तर, एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता.