रांची - जंगलामधून रस्ता ओलांडत असताना रेल्वेने धडक दिल्याने झारखंडमध्ये एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रेल्वेच्या इंजिनाचा पुढील भागही तुटला आहे. जखमी हत्ती तसाच कसाबसा रेल्वे रुळाच्या खाली उतरला आणि जंगलामध्ये निघून गेला. ही घटना झारखंडमधील केसीपूर रेल्वे स्थानकावर घडली.
ओडिशातील भांजपूर येथून बालेश्वरला जात असताना पॅसेंजर रेल्वे हत्तीला धडकल्याने हा अपघात झाला. यामध्ये रेल्वेतील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
जंगलातून रस्ता ओलांडताना बसली रेल्वेची धडक
हत्तीला धडक दिल्यानंतर रेल्वे बराच वेळ घटनास्थळावर थांबली होती. जोराची धडक बसल्याने हत्तीच्या पायाला गंभीर जखम झाली आहे.
भारतामध्ये अनेक रेल्वे मार्ग जंगल क्षेत्रामधून जातात. हत्ती रेल्वे रुळ ओलांडत असताना अपघात झाल्याच्या घटना याआधीही अनेक वेळा घडलेल्या आहेत. अनेक हत्तींचा जोराची धडक बसल्याने मृत्यू देखील झाला आहे. इशान्य पुर्वेकडील राज्यांमध्ये हत्तीला रेल्वेने धडक देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.