नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील सीमावादावरून भारत-चीन संबंध ताणले असताना आज(गुरुवार) परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्यात थोड्यात वेळात चर्चा होणार आहे. शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निमित्ताने दोन्ही नेते सीमावादावरही चर्चा करणार आहेत.
मागील ४५ वर्षात भारत-चीन सीमेवर गोळीबार झालेला नव्हता. मात्र, चीनने द्विपक्षीय करारांचे उल्लंघन करत गोळीबार केला. भारतीय लष्कराने पँगाँग तलावाच्या दक्षिणेकडील मोक्याच्या ठिकणांवर ताबा मिळवला आहे. चीनने अतिक्रमण करण्याच्या आधीच भारताने कारवाई करत आघाडी मिळवली. मात्र, यानंतर दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत.
नुकतेच एससीओ परिषदेच्या निमित्ताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी वेई फेंग यांची भेट घेतली होती. यावेळी भारत आणि चीनने एकमेकांवर आरोप केले होते. सीमेवरील तणाव निवळण्यासाठी चीनने तत्काळ पावले उचलण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले होते, तर भारताने गलवान खोऱ्यातून मागे जावे, असे चीनने म्हटले. मात्र, या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नाही. वरिष्ठ पातळीवरील ही आता दुसरी बैठक आहे.
लडाख क्षेत्रात चीनचे ५ ते ७ हजार सैन नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ आहेत. रणगाडे, शस्त्रास्त्रे आणि इतर युद्धाच्या सामुग्रीसह चिनी सैन्य तयार आहे. भारतानेही कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली असून अतिरिक्त सैन्य लडाख भागात तैनात केले असून परिस्थिती तणावाची झाली आहे. पँगाँग त्सो, रेचिन ला, रेझिंग ला याभाग भारतीय सैन्याने आघाडी मिळवली आहे. मात्र, येथून भारतीय सैन्याला मागे ढकलण्यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. आत्तापर्यंत भारतीय लष्कराने चीनचे अतिक्रमणाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.