नवी दिल्ली - भाजप नेते दुष्यत सिंह यांचा कोरोना बाधित रुग्णाशी संपर्क आल्याने ते सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. यामुळे उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील खासदारांना कोरोनाचा धसका बसला आहे. खासदारांनी दोन दिवसांपूर्वी दुष्यत सिंह यांच्याबरोबर राष्ट्रपती भवनामध्ये अल्पहार केला होता.
16 मार्चला दुष्यंत सिंह यांचा कनिका कपूरशी संपर्क आला होता. त्याच्या 2 दिवसानंतर म्हणजेच 18 मार्चला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या खासदारांना अल्पोपहारासाठी आमंत्रण दिले होते. कार्यक्रमात 96 खासदारांनी उपस्थिती लावली होती.
माजी केंद्रीय मंत्री आणि मिर्जापूरचे खासदार अनुपिया पटेल, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जनरल व्ही के सिंह, गजेंद्र शेखावत, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, साध्वी निरंजन ज्योती, राज्यवर्धनसिंग राठोड, विजय गोयल, ओम माथुर, रविकिशन, हेमामालिनी, रीटा बहुगुणा जोशी, साक्षी महाराज या खासदारांनीही हजेरी लावली होती. दुष्यंत सिंह सेल्फ आयसोलेशनमध्ये गेल्याने खासदारांमध्येही खळबळ उडाली आहे. यातील काही खासदारांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे.
बेबी डॉल' गाण्याची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तिला लखनऊ येथील केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी ती लंडन वरून भारतात परतली होती. भारतात येण्यापूर्वी ती लंडन येथे काही पार्ट्यांमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर भारतामध्ये आल्यानंतर ती लखनऊ येथील एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही सध्या तपासणी करण्यात येत आहे. कनिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.