हैदराबाद- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मात्र, स्वातंत्र्य दिनाबद्दल देशातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग 7 व्या वर्षी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ते देशाला उद्देशून भाषण करतील. यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला 110 अति महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. मागील वर्षी 440 अतिमहत्वाच्या व्यक्ती स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कोरोना पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत 4 हजार जण स्वांतत्र्यदिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहतील. नरेंद्र मोदी देशाला काय संबोधन करणार याकडे लक्ष लागले आहे. लाल किल्ला येथील कार्यक्रमात 'दो गज की दूरी' या प्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय येथे ध्वजारोहण करण्यात येईल. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्याच्या विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे ध्वजारोहण करणार आहेत. राज्यातील विविध जिल्हा मुख्यालयांमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होतो.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ला येथे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. लाल किल्ला परिसरात 300 कॅमेरे लावण्यात आले असून सुरक्षा दलांचे 4 हजार तेथे तैनात करण्यात आले आहेत.भारतीय सेना दलातील महिला अधिकारी मेजर श्वेता पांडे या नरेंद्र मोदी यांना ध्वजारोहण कार्यक्रमात सहकार्य करणार आहेत.