श्रीनगर - पाकिस्तानी लष्कराकडून जम्मू काश्मिरातील दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नुकतेच सीमेवरील अनेक ठिकाणी शस्त्रे पुरवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा संशयही सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे.
१५ कॉर्प्स कमांडिंग अधिकारी जनरल बी. एस राजू यांनी सांगितले की, 'पीरपांजल भागात सैन्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नियंत्रण रेषेवर कोणत्याही उडणाऱ्या वस्तूवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. काश्मिरातील दहशतवाद्यांना शस्त्र आणि दारुगोळ्याचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे सीमेपलीकडून मदत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत'.
जून महिन्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कठूआ जिल्ह्यात सीमेवर एक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. या ड्रोनमध्ये अमेरिकन बनावटीची एम-४ ही अत्याधुनिक बंदुक आणि ७ चिनी बनावटीची ग्रेनेड, बॅटरी आणि जीपीएस आणि रेडीओ आढळून आला होता. सुमारे १७ किलो या ड्रोनचे वजन होते. पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादाचं हे नवं रुप असल्याचे बी. एस. राजू यांनी सांगितले.
लहान आकाराच्या ड्रोनचा शोध घेणे अवघड असते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग आणि मानवी सुरक्षा वाढवून सीमेवर पहारा देण्यात येत आहे. सीमेवरील सर्वसामान्य नागरिकांच्या हालचालीवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कारण, दहशतवादी सामान्य नागरिकाच्या किंवा मेंढपाळाच्या वेशातही येऊ शकतात, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.