नवी दिल्ली : डॉ. रेड्डी लॅबोरेटॉरीजने देशात अॅव्हिगन (फॅव्हीपिरावीर) टॅब्लेट्स लाँच केल्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या औषधाचा उपयोग केला जातो.
कंपनीने फुजीफिल्म टोयामा केमिकल्ससोबत याबाबत करार केला होता. यानुसार, देशात केवळ डॉ. रेड्डी लॅब्सकडेच या औषधाचे उत्पादन घेण्याचा आणि विक्री करण्याचा अधिकार असणार आहे. अॅव्हिगनला ड्रग्स काऊंसिलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय)चीही परवानगी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
या औषधाचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांवर करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. सध्या आम्ही परिणामकारक, पुरेसे आणि माफक दरात औषध बनवण्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. देशातील कोरोना रुग्णांवरील उपचारात अॅव्हिगन मोलाची भूमिका बजावेल, अशी आम्हाला खात्री असल्याचे डॉ. रेड्डीज लॅबचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. रामना यांनी म्हटले.
दरम्यान, या घोषणेनंतर डॉ. रेड्डीज लॅब्सच्या शेअर्समध्ये ०.१० टक्क्यांनी वाढ होत, ते ४,५०८.९० रुपयांवर पोहोचले होते.
हेही वाचा : कर्नाटक: कारच्या टायरची हवा काढल्याने चक्क पोलिसाचे तहसीलदाराविरोधात धरणे