पणजी - राज्यघटनेनुसार राज्य चालविण्यासाठी राजकारणी मंडळींच्या चुका दाखविण्याबरोबरच पत्रकारांनी आपली मतेही सांगितली पाहिजेत. कारण, सुवर्ण गोवा निर्माण करण्यासाठी पायाभूत सुविधांबरोबर नागरिकांचाही विकास झाला पाहिजे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा श्रमिक पत्रकार संघटना (गुज) आयोजित आंतरराष्ट्रीय पत्रकार स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
'गुज'तर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, अॅड. क्लिओफात आल्मेदा, 'गूज'चे अध्यक्ष किशोर नाईक गावकर आणि सचिव जेराल्ड डिसोझा आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले, पत्रकारिता राजकारण्यांना आरसा दाखविण्याचे काम करत असते. राजकारणी आणि पत्रकार यांमधील संबंध लोकशाहीसाठी महत्त्वाचे असतात. त्याबरोबरच पत्रकारितेचा दर्जा घसरू नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. पत्रकारिता बदलत असताना त्याचे वेगळे स्वरूप समजून घेतले पाहिजे. पत्रकारांनी सत्य समाजासमोर आणून समाजावर कसा चांगला परिणाम घडून येईल, याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
सध्या पत्रकारिता अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात असल्याचे बोलले जाते. परंतु, आणिबाणी एवढी भयानक स्थिती देशात नाही. गोव्यात प्रसारमाध्यमे विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे बोलले जाते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.
शासनाने पत्रकारांच्या समस्या सोडवाव्यात : कवळेकर
गोव्यातील पत्रकारांच्या समस्या काही प्रमाणात सोडविल्या गेल्या आहेत. परंतु, ज्या काही बाकी आहेत, त्या कशा सोडविता येतील याकडे सरकारने लक्ष द्यावे. मला शक्य होईल तेव्हा विधानसभेत याविषयी आवाज उठवला जाईल, असे प्रतिपादन विरोधीपक्षनेते बाबू कवळेकर यांनी यावेळी बोलताना केले.