अयोध्या (उत्तर प्रदेश) - लॉकडाऊन आणि कोरोना फैलावाच्या संकटातही श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला भाविकांकडून देणग्या मिळणे थांबलेले नाही. अयोध्येत राम मंदिर बांधण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टवरती आहे. केवळ लॉकडाऊनच्या कालावधीत ट्रस्टच्या बँक खात्यांमध्ये 4.6 कोटी रुपये देणगीस्वरूपात जमा झाले आहेत. कोरोनाच्या संकटातही रामजन्मभूमीवर रामाचे मंदिर बांधण्यासाठी रामभक्त आतुर असल्याचे यावरून दिसत आहे.
भगवान श्रीरामांच्या भक्तांना कोरोनाचे संकटही राममंदिरासाठी देणग्या देण्यापासून अडवू शकलेले नाही. याविषयी राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी माहिती दिली. "आम्हाला खात्री आहे की, मंदिरासाठी पैशाची कमतरता भासणार नाही. लोक या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची देणगी देत आहेत आणि मंदिर बांधले जाईल, अशी आम्ही पूर्ण खात्री देतो. याची भव्यता आणि बांधकाम अतुलनीय असेल,' असे दास म्हणाले. मार्चमध्ये ट्रस्टने त्यांच्या बँक खात्यांमध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या स्वीकारण्यास सुरुवात केली होती.
यूपीआय, आरटीजीएस आणि बँक हस्तांतरणाच्या माध्यमातून ट्रस्टच्या खात्यात देणगी देण्यात आली आहे. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांनी देणगी दिली आहे. ट्रस्टचे एक बचत आणि एक चालू बँक खाते आहे, ज्यामध्ये पैसे हस्तांतरित केले जाऊ शकतात.