चंदीगड - भतेरी देवी या वयोवृद्ध महिलेचा घरामध्ये काम करताना खाली पडल्याने पाय मोडला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी महिलेला अॅडमिट करून घेत ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इजा झालेला पाय सोडून दुसऱ्याच पायाचं ऑपरेशन करण्याचा प्रताप डॉक्टरांनी केला. हा वैद्यकीय निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार हरयाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यात घडला.
भतेरी देवी ही वयोवृद्ध महिला घरात काम करताना पडली. त्यामुळे तिच्या उजवा पाय मोडला. मात्र, डॉक्टरांनी डाव्या पायाचे ऑपरेशन केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा वैद्यकीय निष्काळजीपणा असून कारवाई करण्याची मागणी भतेरी देवीच्या कुटुंबीयांनी केली आहे. डॉक्टरांनी दोनदा ऑपरेशन केल्याचा दावाही कुटुंबीयांनी केला आहे.
दोन्ही पायांना इजा झाल्याचा डॉक्टरांचा दावा -
एक आठवड्यापूर्वी डॉक्टरांनी उजवा पाय मोडलेला असताना डाव्या पायावर ऑपरेशन केले. मात्र, नंतर पुन्हा दुसऱ्यांदा उजव्या पायाचे ऑपरेशन केले. त्याचे कोणतेही पैसे घेतले नाही. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असून मुख्य वैद्यकीय अधिकारी या समितीचे प्रमुख असतील, अशी माहिती मुख्य व्यवस्थापक डॉ. सपना गेहलावत यांनी दिली. जर यामध्ये कोणी दोषी आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे गेहलावत यांनी सांगितले. दरम्यान, या वृद्ध महिलेच्या दोन्ही पायांना इजा झाल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.