मुंबई - कर्नाटकमधील जेडीएस आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना मनवण्यासाठी आलेल्या काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. मुंबईमधील पवई येथील रेनिसेन्स या हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांची भेट घेण्यासाठी 9 तास वाट बघणाऱ्या शिवकुमार यांना आमदरांना न भेटताचला परत जावे लागले आहे.
सकाळी साडेआठ वाजता शिवकुमार हे रेनिसेन्स हॉटेलच्या परिसरात पोहोचले. त्यांचे हॉटेल बुकींग असताना ही त्यांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. या हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांनी शिवकुमार यांच्यामुळे आमच्या जीवाला धोका आहे असे पत्र दिल्यामुळे त्यांना आतमध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. यानंतर शिवकुमार आणि त्यांच्याबरोबर आलेल्या मंत्र्यांनी हॉटेलबाहेर ठिय्या धरला होता. त्यांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात येत होते. त्यामुळे या हॉटेल परिसरात जमावबंदी करण्यात आली होती.
यावेळी काँग्रेस नेते संजय निरुपम, मिलींद देवरा, नसीम खान हे देखील आले होते. अनेक वेळा मनधरणी करून सुद्धा शिवकुमार भेटण्यावर कायम राहिल्यामुळे शेवटी पोलिसांनी शिवकुमार,मिलिंद देवरा आणि नसीम खान यांना ताब्यात घेतले. त्यांना मुंबई विद्यापीठातील गेस्ट हाऊस मध्ये रवाना केले. काही काळ विद्यापीठ भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मात्र शिवकुमार यांना विशेष विमानाने ला रवाना करण्यात आले. यावेळी जे झाले खूप चुकीचे झाले मुबंईचा अनुभव खूप वाईट होता असे जाता जाता कुमार यांनी सांगितले आहे.