नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वात मोठा रामलीला सोहळा दरवर्षी लाल किल्ल्यावर आयोजित केला जातो. या सोहळ्याला पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गज उपस्थिती दर्शवतात. यावर्षी मात्र, कोरोना महामारीमुळे हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. गेल्या ८० वर्षांमध्ये पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लव-कुश रामलीला समिती या सोहळ्याचे आयोजन करते. देशाच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या सोहळ्यासाठी परवानगी नाकारल्याचे रामलीला समितीने म्हटले आहे. दिल्ली सरकारने सार्वजनिक कार्यक्रमांसाठी विशेष नियमावली जाहीर केली आहे. सोहळ्याला अवघे सात दिवस शिल्लक असताना सरकारने लागू केलेल्या अटींची पूर्तता करणेही शक्य नसल्याचे समितीने सांगितले. दरवर्षी होणाऱ्या या रामलीला सोहळ्यामध्ये सुमारे ५०० कलाकार सहभागी होतात.
दरवर्षी दिल्लीमध्ये सुमारे ८०० ठिकाणी छोटे-मोठे रामलीला सोहळे आयोजित केले जातात. रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रामलीला सोहळे आणि दुर्गा पूजा सोहळ्यांना परवानगी दिली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियम आणि अटींची पूर्तता करुनच हे सोहळे आयोजित करता येतील असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे बहुतांश रामलीला सोहळे यावर्षी रद्द करण्यात येत आहेत.
दिल्लीमध्ये आतापर्यंत ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७१ लाखांवर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनीदेखील सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा : विशेष : दृष्टीहीन, अनाथ मुलांसाठी आशेचा किरण ठरलेले 'बाबा सूबा सिंह'