नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींची फाशी कायदेशीर प्रक्रियेत अडकली आहे. पटियाला हाऊस न्यायालयाने दोन वेळा डेथ वॉरंट काढले. मात्र, दोन्ही वेळेस त्यांची फाशी टळली. आता नव्याने डेथ वॉरंट काढण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे निर्भयाचे कुटुंबीय आक्रमक झाले आहे.
दोषींना फाशी होत नसल्याने निर्भयाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत पटीयाला हाऊस कोर्टाबाहेर निदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत महिला हक्क कार्यकर्त्या योगिता भायना या देखील होत्या. आरोपींना फाशी द्या, अशा घोषणा कुटुंबीयांनी न्यायालयासमोर दिल्या.
न्यायाधीश दोषींना सहकार्य करत आहेत. फाशीची तारीख ठरवण्याची इच्छा न्यायाधीशांमध्ये नाही. फाशी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. चार दोषींना वेगळेगळी फाशी देता येणार नाही. असा निर्णय नुकताच न्यायालयाने दिला आहे. तिघांना फाशीची शिक्षा देता येवू शकते मात्र, एकाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे न्यायालय नव्याने डेथ वॉरंट काढत नाही.