नवी दिल्ली - मोटार वाहन नियमांमध्ये सोमवारी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार, विविध अपराधांसाठीच्या दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. या कायद्याअंतर्गत एका दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावल्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या गाडीलाच आग लावून दिल्याची घटना गुरुवारी घडली आहे.
मालवीय नगरमध्ये वाहतूक पोलिसांची दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकांना ओळखण्यासाठी तपासणी मोहीम सुरू होती. यावळी पोलिसांनी एका राकेश नावाच्या दुचाकीस्वाराला दारूच्या नशेत गाडी चालवताना पकडले. त्याला दंड ठोठवल्यानंतर राकेशला राग आला आणि रागाच्या भरात त्याने स्वत:च्या दुचाकीला आग लावली.
हे ही वाचा- हेल्मेट घातले नाही म्हणून कारचालकाला दंड!
दुचाकीस्वाराच्या या कृत्यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये खळबळ उडाली. याबाबत स्थानिक पोलिसांना तसेच अग्निशमन विभागालाही कळवण्यात आले. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राकेशला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा- मोटार वाहन कायद्याचा झटका, रिक्षाचालकाला तब्बल ४७,५०० रुपयांचा दंड
मोटर वाहन दुरुस्ती विधेयक गेल्या 31 जुलैला राज्यसभेत पास झाले होते. 1 सप्टेंबरपासून नवीन मोटार वाहन कायदा लागू करण्यात आला आहे. यामध्ये ट्रफिक नियम तोडल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलानाची रक्कम 10 पटीने वाढवण्यात आली आहे.