नवी दिल्ली - कर्नाटकचे वरिष्ठ काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अवैध संपत्तीप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून याआधी त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता.
आज काही तासांपूर्वीच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी शिवकुमार यांची भेट घेतली होती. शिवकुमार यांचे बंधू आणि काँग्रेसचे आमदार डी. के. सुरेश यांनी या भेटीविषयी माहिती दिली. 'सोनिया यांनी संपूर्ण पक्ष तुमच्यासोबत असल्याचे शिवकुमार यांना सांगितले. हा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय हेतू आहे. अशाच प्रकारे इतर नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. आम्हाला यातून बाहेर पडण्याचा उपाय शोधावाच लागेल,' असे सुरेश यांनी माध्यमांना सांगितले होते.
शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अवैध संपत्तीप्रकरणी ३ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. शिवकुमार काँग्रेससाठी कर्नाटकातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी कर्नाटकातील जेडीएस-काँग्रेस युती सरकार सुरळीत चालू ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.