नवी दिल्ली - एलएनजीपी रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओवर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा घटना खळबळजनक बनवायला नको. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह कमी होऊ शकतो, असे जैन म्हणाले.
काय होता व्हायरल व्हिडिओ?
दिल्लीतील एलएनजीपी रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांजवळच एक शव ठेवण्यात आले होते. तेथे जवळ कोणी वैद्यकीय कर्मचारीही नव्हता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उभे होत आहेत.
‘आपण समजून घ्यायला हवे की आपले डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. अशा व्हिडिओंमुळे त्यांचा उत्साह कमी होईल. काही आरोग्य कर्मचारी मागील 2 ते 3 महिन्यांपासून घरी गेले नाहीत. मृत्यू हा क्लेशदायक असतो. याप्रकरणी योग्य ती काळजी घेतली जाईल’, असे जैन म्हणाले.
एलएनजीपी हे दिल्लीतील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असून तेथे 2 हजार खाटांची व्यवस्था आहे. कोरोनाग्रस्तांवर येथे उपचार सुरु आहेत.