नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. आज (शनिवार) वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित यांनी १५ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. १९९८ ते २०१३ या काळात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते.
- अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वाहिली श्रद्धांजली
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अनेक नेत्यांकडून दु:ख व्यक्त
- उद्या (रविवार) बोध घाटावर होणार अंत्यसंस्कार
- निजामुद्दीन येथे राहत्या घरी शीला दीक्षित यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.
- 3:55 मिनिटाला डॉक्टरांनी शीला दीक्षित यांना मृत घोषित केले.
- डॉक्टरांनी पुन्हा उपचार सुरू केले.
- परंतु, थोड्यात वेळात पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला.
- उपचारानंतर थोड्यावेळासाठी शीला दीक्षित यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
- डॉ. अशोक सेठ यांच्या नेतृत्वात शीला दीक्षित यांच्यावर उपचार करण्यात आले.
- गंभीर अवस्थेत शीला दीक्षित यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- सकाळी ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर शीला दीक्षित यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
दिल्लीत सर्वांत जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबमधील कपुरथळा येथे त्यांचा जन्म झाला होता. नवी दिल्लीच्या कॉन्वेंट ऑफ जीजस अॅन्ड मेरी स्कूल येथून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले होते. दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेज येथून त्यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठातून त्यांनी फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट केली.
भारतीय प्रशासकीय सेवेत असणाऱ्या दिवंगत विनोद दीक्षित यांच्याशी शीला दीक्षित यांनी विवाह केला होता. त्यांचा मुलगा संदीप दीक्षित कॉंग्रेसचा खासदार आहे. १९७० मध्ये त्या यंग वूमन असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. गारमेंट एक्सपोर्ट असोसिएशनच्या त्या सचिवही होत्या. राजकारणात त्यांचा प्रवेश अपघाताने झाला होता. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांच्यातील प्रशासकीय कौशल्य जाणले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिलांविषयी असलेल्या विशेष समितीत पाठवले होते. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धूरा सांभाळली. त्या दिल्लीच्या तब्बल तीन वेळा मुख्यमंत्री होत्या. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेसमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
शीला दीक्षित यांचा राजकीय प्रवास -
शीला दीक्षित यांनी १९८४ ते १९८९ पर्यंत उत्तरप्रदेशमधील कन्नौज लोकसभेच्या खासदार होत्या. १९८६ ते १९८९ या कालावधीत शीला दीक्षित यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. शीला दीक्षित यांची २०१४ मध्ये केरळ राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांनी २५ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीनामा देत काँग्रेसमध्ये पूर्णकाळ कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शीला दिक्षीत यांना भाजपच्या मनोज तिवारीकडून पराभवचा धक्का बसला.