नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान झाले होते. निवडणुकीत ५९३ पुरुष उमेदवार आणि ७९ महिला उमेदवारांनी सहभाग घेतला होता. मतदानानंतर सर्व मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्सिट्स पोल) आम आदमी पक्षाला बहुमत येईल, असे चित्र दाखविले आहे.
आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये थेट लढत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसला दिल्लीत खातेही उघडता येणार नाही, असेही अनेक मतदानोत्तर चाचण्यांचे कल आहेत. ८ फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर २४ तासांचा कालावधी उलटल्यावरही मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली नव्हती. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. आम आदमी पक्षाने यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावर्षी एकूण 62.59 टक्के लोकांनी मतदान केले. 2015 मध्ये विधानसभा निवडणुकीत 67.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा ५ टक्के कमी मतदान झाले आहे.
दिल्लीतील या केंद्रांवर होणार मतमोजणी -
मतगणना पूर्वी दिल्लीमधील सीडब्ल्यूजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, पश्चिम दिल्लीत एनएसआईटी, दक्षिण-पूर्व दिल्लीमध्ये मीराबाई इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि जीबी पंत इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मध्य दिल्लीमधील सर सी.व्ही.रमण आयटीआय, धीरपूर, उत्तर दिल्लीत बवानाच्या राजीव गांधी स्टेडियम आणि अन्य ठिकाणांवर होईल. मतगणनेसाठी 33 पर्यवेक्षक असणार आहेत. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम्सवर सुरक्षारक्षकांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाभोवती चर्चा -
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या 'आप'ची सत्ता होती. गेल्या ५ वर्षात केलेल्या कामांना घेऊन केजरीवाल जनतेसमोर गेले. 'आपण दिल्लीतील लोकांना मोफत आणि स्वच्छ पाणी दिले. माफक दरात वीज दिली. प्रत्येकाला लवकरात लवकर उपचार मिळावा यासाठी मोहल्ला क्लिनिकसारख्या योजना राबवल्या आणि दिल्लीतील सर्व सरकारी शाळा खासगी शाळांपेक्षा अधिक चांगल्या बनवल्या आहेत', असा दावा केजरीवाल सरकारकडून केला गेला. विधानसभा प्रचाराच्या रणधुमाळीत केजरीवाल सरकारचा भर याच मूलभूत मुद्द्यांवर राहिलेला दिसून येतो. याऊलट भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरला. कलम ३७०, राम मंदिर आणि राष्ट्रीय सुरक्षा या त्रिसुत्रीभोवती भाजपची संपूर्ण प्रचार मोहिम फिरताना दिसून आली.