नवी दिल्ली - राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि समर्थक आमदारांनी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली. राज्यातील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याचा दावाही पायलट यांनी केला. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी आज(रविवार) केली. दलबदलू लोक प्रतिनिधीला कोणतेही सार्वजनिक कार्यालय पाच वर्षांसाठी उपभोगण्यास आणि पुढील निवडणूक लढण्यास बंदी घालण्याची तरतूद कायद्यात करण्याची मागणी त्यांनी केली.
निवडून आलेल्या सरकारला भ्रष्ट मार्गाने पाडण्यापासून रोखण्याच्या 'अॅन्टिबॉडीज' राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टात म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याच्या घटनादुरुस्तीत आहेत, असे सिब्बल म्हणाले. सचिन पायलट यांनी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली असून 18 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी पक्षातंर बंदी कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी केली. पायलट यांनी बंडोखोरी केल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून आणि राजस्थान पक्षाध्यक्ष पदावरु काढून टाकण्यात आले आहे.
काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपने केल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. 'वुहानसारख्याच दिल्लीतील एका ठिकाणावरुन सरकार पाडण्याच्या विषाणू विरोधात लढण्यासाठी लसीची गरज आहे. या विषाणू विरोधातील अॅन्टिबॉडीज(प्रतिजैवक) राज्यघटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या घटना दुरुस्तीत आहेत, असे सिब्बल म्हणाले. असे म्हणत सिब्बल यांनी केंंद्र सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.
तीन मोठ्या राज्यातील सत्तासंघर्षामागे बंडखोरी
मागील काही दिवसांत देशातील तीन मोठ्या राज्यात आमदारांच्या बंडखोरीमुळे सत्तासंघर्ष निर्माण झाला. कर्नाटकात काँग्रेस आणि आघाडी पक्षाच्या आमदारांनी बंडोखोरी केल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले होते. तर त्याजागी भाजपचे सरकार सत्तेत आले. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह काँग्रेसच्या 22 आमदारांनी पक्षाला रामराम ठोकल्याने काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले. त्याजागी भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सराकार आले. आता राजस्थानात काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केली आहे. आमदारांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारल्याने राजकीय अस्थिरता पहायला मिळाली आहे.