नवी दिल्ली - भाजप नेते साजिद अली यांना काही अनोळखी व्यक्तींनी दाढी काढण्यास सांगत धमकावल्याची घटना घडली आहे. काल (गुरुवार) रात्री उशीरा काही लोक साजिद यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी साजिद यांना 'दाढी काढ किंवा पक्ष सोड' अशी धमकी दिली.
साजिद हे ईशान्य दिल्ली प्रभागातील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत. या सर्व प्रकाराची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२.१५ च्या दरम्यान ते घराबाहेर पडले असता, तिथे थांबलेल्या काही लोकांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी साजिद यांना दाढी काढ अथवा पक्ष सोड अशा धमक्या दिल्या.
भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षात जाण्यास ते सांगत होते. यावेळी त्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही असभ्य भाषेत टीका केली, असेही साजिद यांनी सांगितले. दरम्यान, अली यांनी याबाबत पोलिसांना आणि पक्षाच्या वरिष्ठांना माहिती दिली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे.
हेही वाचा : अनधिकृत पार्किंग दाखवा बक्षीस जिंका.. लवकरच!