नवी दिल्ली - लोकसभा निडवणूक आता तिसऱ्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे. २३ एप्रिलला देशातील १५५ जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी एकूण १ हजार ६१२ उमेदवार रिंगणात आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने या उमेदवारांच्या शपथपत्रांचा अभ्यास केला. त्यामध्ये विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या उमेदवारांची माहिती समोर आली आहे. त्यावर एक नजर टाकू.
तिसऱ्या टप्प्यात देशातील १३ राज्यांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी एकूण १ हजार ६१२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी १ हजार ५९४ उमेदवारांच्या शपथपत्रांचा एडीआरने अभ्यास केला. उर्वरीत उमेदवारांचे शपथपत्र स्पष्ट नसल्यामुळे त्यांची पडताळणी करणे शक्य झाले नाही. या उमेदवारांपैकी २३० म्हणजेच १४ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्हेगार आहेत. तर, ३४० म्हणजेच २१ टक्के असे उमेदवार आहेत ज्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.
गंभीर गुन्हे म्हणजे काय ?
एडीआरने गंभीर गुन्हे ठरवण्यासाठी काही मापदंड ठरवले आहेत. त्यानुसार
१. पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले उमेदवार.
२. अजामीनपात्र गुन्हे.
३. निवडणूकींशी संबंधीत गुन्हे.
४. सरकारी खजिन्याला नुकसान पोहोचवण्याचा अपराध.
५. हल्ला, हत्या, अपहरण आणि बलात्कार या सारखे गुन्हे.
६. लोक प्रतिनिधींच्या अधिनियमातील गुन्हे.
७. भ्रष्टाचार निरोधक अधिनियमाअंतर्गत गुन्हे दाखल असेलेले उमेदवार गंभीर गुन्ह्यांच्या यादीत मोडतात.
दोष सिद्ध झालेले उमेदवार - १५९४ उमेदवारांपैकी १४ उमेदवारांनी आपल्यावर दोष सिद्ध झाल्याचे नमूद केले आहे.
हत्येचा दोष सिद्ध झालेले उमेदवार - एकूण १३ उमेदवारांनी हत्या केल्याचे कबूल केले आहे. म्हणजेच त्यांच्यावर आयपीसीची कलम ३०२ अंतर्गत दोष सिद्ध झाला आहे.
हत्येचा प्रयत्न केलेले उमेदवार - १५९४ उमेदवारांपैकी ३० उमेदवारांनी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच भादंवीची कलम ३०७ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
अपहरण करणारे उमेदवार - उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार १४ उमेदवारांवर अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
महिलांवर अत्याचार करणारे उमेदवार - तिसऱ्या टप्प्यात निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांमध्ये जवळपास २९ उमेदवारांनी महिलांवर अनन्य अत्याचार केला आहे. त्यामध्ये बलात्कार, महिलेचा विनयभंग करणे आणि त्यांच्यावर त्यासाठी हल्ला करणारेही उमेदवार रिंगणात आहेत. तसेच महिलेच्या पती किंवा कुटुंबियांवर क्रूरता करणारेही उमेदवार उभे आहेत.
उग्र भाषण देणारे उमेदवार - २६ उमेदवारांनी आपल्यावर उग्र भाषण देण्याचे गुन्हे दाखल असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.
कोणता पक्ष वरचढ -
लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पक्षाच्या आधारावर अभ्यास केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय पक्षांमध्ये भाजप, काँग्रेस आणि बसप या पक्षांचा समावेश आहे. यामध्ये भाजपच्या ९७ उमेदवारांपैकी २६ म्हणजेच २७ टक्के उमेदवार गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर, काँग्रेसमधील ९० पैकी २४ म्हणजे भाजप एवढेच उमेदवार गंभीर गुन्हेगार आहेत. बसपवर नजर टाकली तर ९२ पैकी ९ म्हणजेच १० टक्के उमेदवार हे गंभीर गुन्ह्याखाली आहेत.
सामान्य गुन्हेगारीमध्ये काँग्रेसच्या ९० पैकी ४० म्हणेज ४४ टक्के उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या ९७ पैकी ३८ म्हणजेच ३९ टक्के उमेदवार हे सामान्य गुन्हेगाराच्या यादीत मोडतात. तर, बहुजन समाज पक्षाच्या ९२ पैकी १६ म्हणजेच १७ टक्के उमेदवार हे सामान्य गुन्हेगार आहेत.
एकंदरीत पाहिल्यास काँग्रेस हा पक्ष गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात अग्रस्थानी आहे. तर, भाजप यामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
राज्यपातळीवर हे चित्र अधिकच गंभीर स्वरुपाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५० टक्के उमेदवार हे गंभीर गुन्ह्याखाली आहेत. तर ६० टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर सीपीआय, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसचा क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ शिवसेनेचे ३२ टक्के उमेदवार हे सामान्य गुन्ह्याखाली आहेत तर, २७ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत.