हैदराबाद - देशभरामध्ये कोरोना विषाणूचे थैमान घातले असून रुग्ण संख्या वाढत आहे. यातच रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. हैदराबादमधील गांधी रुग्णालयात चेरापल्ली मध्य कारागृहातील चार कोरोनाबाधित कैद्यांवर उपचार सुरु होते. गुरुवारी ते बाधित कैदी बेपत्ता झाल्याचे आढळले आहे.
चेरापल्ली मध्य कारागृहातील कैद्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर त्यातील 4 जणांना कोरोनाची लागण असल्याचे समोर आले होते. त्यावर चारही कैद्यांना उपचारासाठी गांधी रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले. गांधी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी सकाळी 3 वाजल्यापासून ते आढळले नाही.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये सात मजले आहेत. प्रत्येक ठिकाणी सेक्युरीटी पॉईंट आहेत. त्यामुळे कैदी पळून जाऊ शकत नाहीत. इमारतीमध्ये त्यांचा शोध सुरु असल्याचे सहायक पोलीस आयुक्त पी.वेंकट रामना यांनी सांगितले. दरम्यान, तेलंगणामध्ये 27 हजार 600 रुग्णांवर उपचार सुरु असून 788 जणांचा मृत्यू झाला आहे.