हैदराबाद : देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांहून अधिक झाली आहे. कोरोनावरील कोव्हॅक्सिन, झायकोव्ह-डी आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाची कोव्हिशील्ड या लसींच्या चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर पाहूया, देशभरातील कोरोना संबंधित घडामोडी...
- दिल्ली..
नवी दिल्ली : सोमवारी दिल्लीमध्ये १,४५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. दिल्लीत आतापर्यंत एकूण १.६१ लाख कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, शहरातील कोरोना मृत्यूंची संख्या ४,३००वर पोहोचली आहे.
गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मेट्रो सेवा पुढील महिन्यात सुरू केली जाऊ शकते. काही अंशी ही सेवा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामधील ही मोठी घोषणा असू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
- हरियाणा..
चंदिगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांनी सहा दिवसांपूर्वीच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासोबत एका बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर शेखावत यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर खट्टर यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
- झारखंड..
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि राज्यसभा सदस्य शिबू सोरेन यांना सोमवारी राजधानीमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नी रूपी सोरेन यांना कोरोनाची लागण झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते.
- ओडिशा..
भुवनेश्वर : सोमवारी ओडिशामधील २,५१९ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली. आतापर्यंतची एका दिवसातील डिस्चार्ज मिळणाऱ्यांची ही सर्वोच्च संख्या आहे.
- कर्नाटक..
बंगळुरू : कर्नाटक सरकारने आंतरराज्यीय प्रवाशांसाठीची नवीन नियमावली सोमवारी जाहीर केली. सेवा सिंधू पोर्टलवरील रजिस्ट्रेशन, हातावर शिक्के मारणे, १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी आणि राज्याच्या सीमेवरील, बस स्थानकांवरील तसेच रेल्वे स्थानकांवरील आणि विमातळावरील वैद्यकीय तपासणी बंद करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले.