हैदराबाद - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात देशात सर्वाधित 35 हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात कोरोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा आता 10 लाख 38 हजार 716 वर पोहचला असून, ही चिंतेची बाब आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या आता 26 हजार 273 इतकी झाली आहे. एकीकडे रुग्ण बरे होण्याची संख्या जरी वाढत असली तरीही नव्या कोरोना रुग्णांची नोंदही वाढत आहे.
- महाराष्ट्र
राज्यातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी घोषित केली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
शनिवारी कोरोनाचे नवीन ८ हजार ३४८ नवीन रुगण आढळले आहेत. सध्या राज्यात १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख २२ हजार ५६४ नमुन्यांपैकी ३ लाख ९३७ नमुने पॉझिटिव्ह (१९.७६ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ४० हजार ८८४ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ५५२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दरम्यान, राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा ३.८५ टक्के आहे.
- नवी दिल्ली -
राजधानीत लगातार अकराव्या दिवशी कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील 24 तासात दिल्लीत 1 हजार 973 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 1 लाख 1 हजार 274 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा 83.29 टक्के आहे. सध्या राजधानीत एकूण 16 हजार 711 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शनिवारी दिल्लीत 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 597 इतकी आहे.
- मध्य प्रदेश
राज्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. शनिवारी भोपाळचे पोलीस अधीक्षक प्रेम प्रकाश गौतम यांचे कोरोनामळे मृत्यू झाला आहे. गौतम यांनी 38 वर्ष पोलीस खात्यात सेवा दिली आहे. ते सध्या सीआयडीमध्ये कार्यरत होते. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चिरायु रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी त्यांचे निधन झाले.
- छत्तीसगड
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्यास 400 रुपयांपासून ते 1 हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- बिहार
बिहारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी राज्यात कोविड सेंटरची संख्या वाढवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच बंद असलेले नर्सिंग स्कूल आणि कॉलेज यांना ताब्यात घेऊन त्यात आयसोलेशन सेंटर तयार करण्यात येणार आहेत.
- आसाम
राज्यात शनिवारी 1 हजार 117 नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 22 हजार 981 कोरोना रुग्ण आसामध्ये आहेत. यातील 15 हजार 165 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, 7 हजार 760 रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात आतपर्यंत 53 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- तेलंगाणा
तेलंगाणात शनिवारी 1 हजार 284 नवे कोरोना रुग्ण आढळले असून, 6 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या 43 हजार 780 कोरोना रुग्ण आहेत. यातील 12 हजार 765 रुग्णांवर उपचार सुरू असून, 30 हजार 607 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 409 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.