हैदराबाद - देशात मागील 24 तासात सर्वाधिक 19 हजार 459 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 380 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येसह आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. यात 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 3 लाख 21 हजार 722 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळे देशात 16 हजार 475 जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
दिल्ली -
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी, दिल्लीत 'प्लाझ्मा बॅक'ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. दिल्लीच्या लिव्हर अॅन्ड बिलियरी सायन्स इन्सिट्यूटमध्ये या बॅकेची स्थापना करण्यात येणार असून बॅकेची सुरूवात पुढील दोन दिवसात केली जाणार आहे. रुग्णाला प्लाझ्माची गरज असल्यास, रुग्णालय किंवा डॉक्टर बॅकेशी संपर्क करून प्लाझ्मा मिळवू शकतात.
दरम्यान, ज्यांनी कोरोनावर मात केली आहे, अशांनी प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे. जे प्लाझ्मा देऊ इच्छित आहेत, अशांसाठी वाहतूकीची व्यवस्था दिल्ली सरकार करणार आहे.
------------------------------
महाराष्ट्र -
मुंबई-नागपूर - देशात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, देशभरात आयएमएच्या 20 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 950 डॉक्टर कोरोना संक्रमित आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरात जगातील सर्वात मोठ्या प्लाझ्मा थेरपी ट्रायल सेंटरचे उद्धाटन केले. राज्यातील २३ वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपी सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्रोजेक्ट प्लॅटिना प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केले. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बॅंक, प्लाझ्मा ट्रायल आणि ईर्मजन्सी ऑथराजेशन या चार सुविधांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधीत जिल्ह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते.
------------------------------
कर्नाटक -
बंगळुरु - शहरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची भर पडत आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. अशात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या पार्श्वभूमिवर शहरातील डीजी आणि आयुक्त कार्यालयासह तब्बल 31 पोलीस स्टेशन सील करण्यात आले आहेत.
------------------------------
हिमाचल प्रदेश -
शिमला - हिमाचल प्रदेशात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 919 इतकी झाली आहे, त्यापैकी 350 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर 534 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
------------------------------
झारखंड -
रांची - सोमवारी आणखी एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूसह कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 14 इतकी झाली आहे. आतापर्यंत झारखंडमध्ये 2 हजार 386 रुग्ण आढळून आले आहेत. यात 559 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
------------------------------
राजस्थान -
जयपूर - राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ग्रामीण भागातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. पण, यासाठी त्यांनी फिजीकल डिस्टन्सिंग पाळावे, लागणार अशी अट घातली आहे. दरम्यान, 31 मे रोजी राज्य सरकारने 30 जून पर्यंत कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्यासाठी परवानगी दिलेली नव्हती. राजस्थानमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना 14 दिवसांचा क्वारंटाईन करावा, लागेल असेही गहलोत यांनी स्पष्ट केले आहे.
------------------------------
उत्तराखंड -
डेहराडून - उत्तराखंडमध्ये सोमवारी 8 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. राज्यात 2 हजार 831 रुग्ण आढळले असून यात 659 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 हजार 11 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उत्तराखंड राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 74.51 टक्के आहे.
------------------------------
बिहार -
पटना - बिहार राज्यात सोमवारी 282 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तर 4 जणांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या 63 इतकी झाली आहे. तर नव्या रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या 9 हजार 506 इतकी झाली आहे.
पंजाब -
चंढीगड - सोमवारी पंजाबमध्ये पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या संख्येसह मृत्यूचा आकडा 138 इतका झाला. पंजाबमध्ये सोमवारी 202 नवे रुग्ण आढळले. यासह रुग्णसंख्या 5 हजार 418 वर पोहोचली आहे.
------------------------------
मध्य प्रदेश -
मोरेना - मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात मागील 24 तासात 56 नवे कोरोना रुग्ण आढळले. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील रुग्णसंख्या 404 झाली आहे. यामुळे जिल्हाधिकारी प्रियंका दास यांनी ढोलपूर-मोरेना बॉर्डरसह 26 किलोमीटरचा परिसर पुढील 10 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
------------------------------
ओडिशा -
भुवनेश्वर - सोमवारी ओडिशामध्ये 245 नवे रुग्ण आढळले, यासह आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 859 इतकी झाली आहे.
------------------------------