हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. देशभरात गुरुवारी एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,66,946 वर पोहोचला असून मृत्यूचा आकडा 12,227 झाला आहे. तर 1,94,324 जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या 1,60,384 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्र
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसचे संकट पाहता गणपती उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करुन गणेश मंडळांनी समाजकल्याणाचे कार्यक्रम घ्यावेत, असे सांगितले. कोरोनाव्हायरसचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे यावेळी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे मोठ्या जल्लोषात साजरा करणे शक्य नाही. उत्सवात कोणत्याही प्रकारची गर्दी किंवा मिरवणुकी काढू नयेत, असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्यात शुक्रवारी 3 हजार 752 रुग्ण नवे रुग्ण आढळून आले आहेत.
दिल्ली
दिल्ली सरकारने गुरुवारी शहरातील कंटेनमेंट झोन व आसपासच्या 169 केंद्रांवर रॅपीड टेस्टींग सुरू केली आहे. या टेस्टींगसाठी 341 पथक तयार केली आहेत. दरम्यान, दिल्ली सरकारने कोरोना आरटी-पीसीआर चाचणीसाठी 2400 रुपये किंमत जाहीर केली. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.
कर्नाटक
कोरोनाव्हायरसचा देशभर वाढता प्रादुर्भाव पाहता, राज्यात जनजागृती करण्यासाठी कर्नाटक सरकारने गुरुवारी 'मास्क डे' साजरा केला. राज्याची राजधानी बंगळुरुमधील क्यूबन पार्क परिसरातून पोलिसांनी परेड काढला. माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनीही यात सहभाग घेऊन नागरिकांनी मास्क घालण्याचे आवाहन केले.
केरळ
राज्यात गुरुवारी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूचा आकडा 21 वर पोहोचला आहे. केरळमध्ये गुरुवारी 97 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2797 वर पोहोचला आहे.
गुजरात
कोरोनाव्हायरसची साथ लक्षात घेता जगन्नाथ रथ यात्रा काढू नये यासाठी गुरुवारी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. जगन्नाथ मंदिर ट्रस्टने रथ यात्रेचे आयोजन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली. राज्य सरकारने मिरवणुकीस अद्याप मान्यता दिलेली नाही. पत्रकार व कार्यकर्ते हितेश चवडा यांनी त्यांचे वकील ओम कोतवाल यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यावर एक किंवा दोन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश
राज्यातील कोरोना आता हद्द पार होत चाचला आहे. तब्बल सहा जिल्हे कोरोना मुक्त झाले आहेत. तसेच रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो 75.5 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गुरुवारी 182 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या राज्यात 2308 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले.
बिहार
भाजपचे माजी खासदार पुतुल कुमारी यांना गुरुवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल केले गेले आहे. आरजेडीचे नेता रघुवंश प्रसाद सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, राज्यात गुरुवारी 53 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6993 वर पोहोचला असून 39 जणांचा मृत्यू झाला आहे.
झारखंड
कोरोनव्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता झारखंड सरकारने संपूर्ण राज्यात सार्वजनिक ठिकाणी सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांच्या वापरावर बंदी घातली आहे. आदेशानंतर राज्य सरकारने सर्वांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सार्वजनिक ठिकाणी न करण्याचे आदेश दिले आहेत.
उत्तराखंड
राज्यात कोरोनव्हायचा विळखा वाढत आहे. त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने डेहराडूनच्या रायपूरमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला तात्पुरत्या रुग्णालयात रुपांतरित करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये 2000 रुग्णांवर उपचार होऊ शकणार आहेत. राज्यात गुरुवारी 57 नव्या रुग्णांची वाढ झाली. यासह राज्याती एकूण आकडा 2,079 वर पोहोचला आहे.
ओडिशा
गुरुवारी राज्यात 97 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यासह राज्यात एकूण रुग्ण बरे होण्याचा आकडा 3144 वर पोहोचला आहे. सध्या 1354 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 174 नव्या रुग्णाची वाढ झाली. यासह एकूण बाधितांचा आकडा 4512 झाला आहे.