हैदराबाद- कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. मात्र, यात एक दिलासादायक बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोनाबाधितांचा मृत्यू दर कमी आहे. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्ण कोरोना वर मात करत आहेत. सध्या देशभरात कोरोना सक्रीय (अॅक्टीव्ह) रुग्णांची संख्या 1 लाख 53 हजार 106 आहे. तर 1 लाख 69 हजार 797 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, कोरोनाशी झुंज देत 9,520 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कर्नाटक
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) आंतरराज्यीय बस सेवा 17 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशमधूनही बससेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कर्नाटक राज्यात गेल्या 24 तासात 213 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल सरकारने राज्यात हॉटेल्स सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनांनुसार, केवळ राज्यातील लोकच हॉटेल्समध्ये राहू शकतात. पर्यटक विभागाने म्हटले आहे की, ज्यांना हॉटेल सुरू करायचे आहेत, त्यांनी हॉटेलमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हँड सॅनिटायझर, फेस मास्क, थर्मल स्कॅनिंग, ग्लोव्हजची व्यवस्था करावी लागेल.
बिहार
सोमवारी, बिहारमधील 23 जिल्ह्यांमध्ये 106 कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6,581 वर पोहोचली आहे. नवाडा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांचा आकडा 39 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट 64.21 टक्के झाला आहे.
राजस्थान
दौसा शासकीय रुग्णालयात 14 मे रोजी पेमाराम आणि त्यांची पत्नी सुनीता देवी यांच्यापासून जन्माला आलेल्या मुलाचे नाव लॉकडाऊन मीना असे ठेवण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान राजस्थानमध्ये 1 लाखाहून अधिक मुले जन्माला आली आहेत.
दरम्यान, राजस्थानमधील कोरोना चाचणी सुविधा इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असून राज्यातील रुग्णांचा रिकव्हरी दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी माध्यमांना सांगितले. राजस्थानमध्ये दररोज 25 हजार चाचण्या करण्याची क्षमता असून राज्यात दररोज 13 ते 14 हजार चाचण्या देखील केल्या जातात.
महाराष्ट्र
जवळपास दोन महिन्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने सोमवारपासून मुख्य आणि हार्बर मार्गावरुन पुन्हा सेवा सुरू केली आहे. पण ही सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांपुरतीच मर्यादित ठेवली आहे.
दरम्यान, राज्यात मोठमोठे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असले तरी लॉकडाऊन दरम्यान सायबर क्राइममध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात सोमवारपासून २०२०-२०११ चे शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, परिस्थितीचा आढावा घेत जुलैपासून शाळा पुन्हा सुरू केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.
ओडिशा
राज्य माहिती व जनसंपर्क विभागाने सोमवारी माहिती दिली की, ओडिशामध्ये गेल्या 24 तासांत 146 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह, राज्याची एकूण संख्या 4,055 वर पोहोचली आहे.
झारखंड
राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स) येथे आणखी एक कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण गुमला जिल्ह्यातील रहिवासी होता. झारखंडमधील कोरोनाव्हायरस रुग्णांचा मृत्यूचा आकडा 9 पर्यंत पोहोचला आहे. रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांनाही कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 1,761 असून त्यापैकी 1,451 स्थलांतरीत कामगार आहेत. दरम्यान, कोरोनायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 11 पुजारी ज्योतिर्लिंग बाबाधाममध्ये 44 हजार महामृत्युंजय मंत्रांचा जप करत आहेत.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आशा कामगारांकडून आतापर्यंत 1,6,46,312 स्थलांतरित कामगारांचे सर्वेक्षण केले गेले असून त्यापैकी 1455 जणांना कोरोनाची काही लक्षणे आढळली आहेत. गेल्या 24 तासात 476 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 18 लोकांचा मृत्यू झाला आहे.
गुजरात
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सोमवारी सांगितले की, त्यांचे सरकार राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्याच्या विचारात नाही. लॉकडाऊनबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. नवीन दर सोमवारी मध्यरात्रीपासून अंमलात येणार आहेत. कोरोव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील महसुलात लक्षणीय घट झाल्याने हे पाऊल उचलले जात आहे, तर कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य खर्च वाढणार असल्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले.
नवी दिल्ली
केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात सोमवारी कोरोनाव्हायरस रोखण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. शाह गेल्या 2 दिवसांपासून मुख्यमंत्री आणि दिल्लीचे उपराज्यपाल यांच्याशी सतत भेटी घेत आहेत. त्यांच्यासमवेत दिल्ली सरकारचे मुख्य सचिव विजय देव, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, लोक नायक जयप्रकाश हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.
हरियाणा
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकला मागे ठेवून हरियाणा देशातील पहिल्या दहा राज्यांच्या यादीत सामील झाले आहे. 15 जूनपर्यंत राज्यात कोरोना बाधितांची संख्या 7 हजाराहून अधिक झाली आहेत. 6 जूनपर्यंत 24 मृत्यू होते. मात्र, 15 जून सकाळपर्यंत मृत्यूची संख्या 88 वर पोहोचली आहे.
पंजाब
राज्यात सोमवारी 127 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 3,267 वर गेली आहे. तर सोमवारी 4 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यूची संख्या 71 झाली आहे. तर 753 रुग्ण सध्या अॅक्टीव आहेत.
अजनालामध्ये बीएसएफच्या 16 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वांना जालंधर कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मध्य प्रदेश
84 दिवसानंतर राजधानी भोपाळमधील धार्मिक स्थळे सर्वसामान्यांसाठी खुली झाली आहेत. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पूजा करण्यासाठी करुणाधाम आश्रमात भेट दिली. शासनाने लोकांना तसेच धार्मिक आस्थापना व्यवस्थापनांना योग्य मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सोमवारी धार्मिक स्थळ उघडल्यानंतर मशिदींमध्ये शारीरिक अंतरांच्या निकषांचे पालन करताना मुस्लिमांनी नमाज अदा केली. तथापि, राज्याच्या इतर भागातील धार्मिक स्थळे 8 जूनपासून उघडण्यात आली आहेत.