चंदीगड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कित्येक विस्थापित कामगार परराज्यांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांपैकी कित्येक कामगार घरी परतण्यासाठी नाना पद्धती वापरत आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये अडकलेले असेच एक कामगार कुटुंब चक्क ६०० किलोमीटर पायी चालत आपल्या घरी पोहोचले आहे. राजस्थान ते हरियाणा हा प्रवास करण्यासाठी या कुटुंबाला तब्बल २२ दिवसांची पायपीट करावी लागली.
हरियाणाच्या फतेहबाद जिल्ह्यातील रतिया हलका गावातील हे रहिवासी. पीक काढणीचा हंगाम असल्यामुळे हे नऊ जणांचे कुटुंब सर्व राजस्थानच्या जैसलमेरला गेले होते. यामध्ये दोन वृद्ध व्यक्तींसह एक १२ ते १४ वर्षांच्या लहानग्याचाही समावेश होता. त्यांचे तेथील काम झाल्यानंतर, देशात लॉकडाऊन लागू झाल्यामुळे त्यांचे घरी परतण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. यावेळी राजस्थानमधील स्थानिक प्रशासनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही, तसेच पोलिसांनीही त्यांना त्रास दिला, त्यामुळे आपण चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
सिरसाचे पोलीस उपायुक्त राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात परतल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर, त्यांना बसमधून आपल्या गावी पोहोचवण्यात आले.
हेही वाचा : घरी जाण्यासाठी मच्छिमारांचे अनोखे धाडस, तामिळनाडू ते ओडिशा प्रवास केला चक्क प्लास्टिकच्या बोटीतून..