बंगळुरू - कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. एका किशोरवयीन मुलाने, आपल्या मित्राला चक्क सूटकेसमध्ये टाकून आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोसायटीच्या आवारातच त्याचे हे बिंग फुटले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच नागरिकही आपल्याला जमेल तशी खबरदारी घेत आहेत. कित्येक सोसायटींनी आपल्या इमारतींमध्ये बाहेरच्या लोकांना येण्यास मज्जाव केला आहे. यामुळेच या किशोरवयीन मुलाच्या मित्राला त्यांच्या सोसायटीमध्ये येता येत नव्हते. त्यामुळे चिडून या मुलाने ही योजना आखली.
त्यानुसार त्याने आपल्या मित्राला सुटकेसमध्ये बसण्यास सांगून, त्याने ती सुटकेस ओढत आपल्या सोसायटीमध्ये नेली. तो अगदी घरातही पोहोचला असता, मात्र सुटकेसमध्ये हालचाल होत आहे असे त्याच्या काही शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याला सोसायटीच्या आवारातच अडवून सुटकेस उघडण्यास सांगितली. सुटकेस उघडल्यानंतर, त्याच्या मित्राला त्यातून प्रकट होताना पाहून मात्र त्या सर्वांचे डोळे पांढरे झाले!
यानंतर त्यांनी पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले, तसेच त्यांच्या पालकांनाही पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या मुलांना समज देऊन सोडण्यात आले, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
हेही वाचा : लॉकडाऊन : हैदराबादमधील अवलिया तळीरामांसाठी ठरतोय 'देवदूत'.. वाटतो आहे 'पेग'