नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. भारतात १२९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आज कर्नाटक, तेलंगाणा, हरियाणा, दिल्लीसह लडाख या केंद्रशासित प्रदेशात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात भारतात ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्नाटकात ३, तेलंगाणात १ , दिल्लीत २, लडाखमध्ये ३, हरियाणा २ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. हरियाणमध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील गौतम बुद्ध नगरमध्ये कोरोनाचे २ रुग्ण आढळून आले आहेत.
लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह आणि कारगिलमध्ये आज ३ रुग्ण आढळून आले आहेत. तेथे एकून ६ रुग्ण आढळून आले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.