मुंबई - देशावर कोरोनासारख्या महामारीचे संकट आलेले असताना पोलीस जीवाची पर्वा न करता दिवस रात्र रस्त्यांवर उतरुन काम करत आहेत. देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशात लोकांनी या नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस दिवस रात्र काम करत आहेत.अशीच एक गुजरातमधील महिला पोलीस कर्मचारी आपल्या १४ महिन्यांच्या मुलीला सोबत घेऊन स्वतःच कर्तव्य बजावत आहेत.
आपल्या मुलीच्या जीवाला धोका असल्याची कल्पना असतानादेखील हवालदार अल्काबेन देसाई रस्त्यावर उतरुन आपले काम करत आहेत. मी काही खूप मोठी गोष्ट करत नसून केवळ माझे कर्तव्य पार पाडत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आपले पतीदेखील कामावर जात असल्याने घरी मुलीचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नाही. याच कारणामुळे मी माझ्या मुलीला सोबत घेऊन कामावर जाते, असे अल्काबेन यांनी सांगितले.
पोलीस महानिरीक्षक सुभाष देसाईं यांनी भूज येथे गस्त घालत असताना अलकाबेन यांना पाहिले. यानंतर त्यांनी अल्काबेन यांना सोयीस्कर काम देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. अल्काबेन या सध्या सार्वजनिक ठिकाणी काम करत आहेत. हे त्यांच्या मुलीच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे मी त्यांना पोलीस स्थानकातीलच काम देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याचे आयजीपी त्रिवेदी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.