कोलकाता - देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अद्याप कोरोनाचे संक्रमण रोखण्यात यश आलेले नाही. मात्र, यातच पश्चिम बंगालमधील भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांनी कोरोना महामारी संपली, असे म्हटले आहे. हुगळी जिल्ह्यातील धनाखाली येथील रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले.
कोरोना महामारी संपली असून भाजपाने रॅली घेऊ नये म्हणून, ममता बॅनर्जीचे सरकार राज्यात लॉकडाऊन करत आहे, असा दावाही दिलीप घोष यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, भाजपाचे समर्थक पाहून ममताजींचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. कोरोनामुळे नाही तर, भाजपाच्या भीतीने त्यांना अस्वस्थ वाटत आहे, असेही ते म्हणाले.
यापूर्वीही दिलीप घोष यांचं एक वक्तव्य गाजले होते. गोमूत्राची महती विषद करताना दिलीप घोष यांनी लोकांना करोनापासून बचावासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला होता. 'गोमूत्र पिल्याने कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढते,' असे ते म्हणाले होते. त्यानंतर सोशल मीडयावर ते ट्रोलही झाले होते.
गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 96 हजार 551 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 45 लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. काल दिवसभरात 11 लाख 63 हजार 542 कोरोना चाचण्या पार पडल्या. यानंतर देशातील एकूण कोरोना चाचण्यांची संख्या 5 कोटी, 40 लाख, 97 हजार 975 एवढी झाली आहे.