नवी दिल्ली - पोलीस दलातील जवान अमित राणा (३१) यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु: ख व्यक्त केले आहे. अमितच्या कुटुंबीयांना १ कोटी रक्कम मदत निधी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. अमित २०१० साली दिल्ली पोलीस दलात भरती झाला होता, त्याच्या परिवारात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.
अमित सोनीपत येथे राहत होता तर ईशान्य दिल्लीतील भारत नगर पोलीस ठाण्यात तैनात होता. सोमवारी ४ मेला अमितची प्रकृती खालावल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. अमितच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांचेही विलगीकरण करण्यात आले आहे. दिल्ली पोलीस दलातील कोरोनामुळे हा पहिला मृत्यू आहे.