नवी दिल्ली - मागील काही दिवसांपासून चीन आणि नेपाळसोबत भारताचा सीमावाद चिघळला आहे. यातील चीनबरोबरच्या वादात तर आज(मंगळवार) तीन भारतीय जवानांना वीरमरण आले. लष्करी आणि राजनैतिक पातळीवर हा वाद सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 23 जूनला काँग्रेस कार्यकारणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चीन, नेपाळ सीमा वादासह कोरोना संकट, आर्थिक मंदी, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींवरही चर्चा करण्यात येणार आहे.
सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. विशेष प्रतिनिधी, वरिष्ठ काँग्रेस नेते आणि काँग्रेस शासित राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीत भाग घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीमा वाद सोडविण्यासाठी भारत चीन आणि नेपाळशी राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा करत आहे. या प्रश्नासंबंधी सर्व विरोधी पक्षांना भाजप सरकारने आत्मविश्वासात घ्यावे, अशी मागणी काँग्रेस करत आहे.
भारतीय लष्कराने आज एक पत्रक जारी केले. गलवान व्हॅली भागात वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरु असताना दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री वाद झाले. त्यामध्ये दोन्ही बाजूच्या सैनिकांची जीवितहानी झाली. हे खुप धक्कादायक अविश्वासाहार्य आहे. संरक्षणमंत्री या वृत्ताला दुजोरा देतील का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी ट्विटरवरून केला आहे.
वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवरून सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. कोरोना महामारीचे आर्थिक परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे गरीब, शेतकरी, लघु-मध्यम उद्योग आणि स्थलांतरित मजुरांच्या हातात पैसे द्यावेत, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
राहुल गांधींनीही नुकतेच एक ट्विट केले होते. जर भारत सरकारने पैसा अर्थव्यवस्थेत सोडला नाही तर गरीब नष्ट होतील. मध्यमवर्ग हा नवा गरीब होईल आणि भांडवलदार सगळा देश विकत घेतील, असे ट्विट राहूल गांधींनी केले होते.