जयपूर - बिहार विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाने ५ जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर एमआयएमच्या विजयाची आणि असदुद्दीन ओवैसीची चर्चा सुरू झाली आहे. आता आगामी राजस्थान निवडणुकीत एमआयएमच्या प्रवेशाची चर्चा होत आहे. दरम्यान, काँग्रेसने एमआयएमवर टीका केली आहे. ओवैसी हे भाजपाचे एजंट आहेत असा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, यानंतर काही वेळातच काँग्रेसने आपल्या या वक्तव्याचे खंडनही केले असल्याचे दिसून येते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेश जोशी यांनी मंगळवारी ओवैसींवर टीका केली होती. ओवैसी हे भाजपा आणि पंतप्रधान मोदींचे एजंट आहेत. भाजपाच्या सांगण्यानुसार ओवैसी निवडणूक लढवत असल्याचा आरोपही जोशी यांनी यावेळी केला. भाजपाने सांगितल्याप्रमाणे ओवैसी निवडणूक लढवतात आणि अशा राजकारण्यांना लोक नाकारतात, असेही जोशी म्हणाले.
दरम्यान, भाजपा नेत्या अल्का सिंग गुर्जर यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. राजस्थानात ओवैसी येऊ द्या किंवा राहुल गांधी येऊ द्यात, पंतप्रधान मोदींनी केलेली विकासकामे जनता कदापि विसरणार नाही, असे गुर्जर म्हणाल्या. काँग्रेसचे खोटे दावे लोकांना समजले असून ओवैसींचा काळ संपत आला आहे, असेही गुर्जर म्हणाल्या. राजस्थानात एमआयएम पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. सोशल मीडियावर एमआयएमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे.