नवी दिल्ली - भाजप नेत्यांवर सोशल मीडिया जायंट फेसबुक आणि व्हॉट्सअॅप मेहरबान असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वी 'द वॉल स्ट्रिट जर्नल'ने प्रसिद्ध केला होता. भाजप नेत्यांच्या धार्मिक तिरस्कार आणि द्वेष पसरविणाऱ्या फेसबुक पोस्टवर कारवाई करण्यास कंपनी टाळाटाळ करत असल्याचे यात म्हटले होते. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर भारतातील फेसबुकच्या व्यवसायावर परिणाम होईल, असे वरिष्ठांनी कर्मचाऱ्यांना सांगितल्याचे अहवालात म्हटले होते. या प्रकरणी विरोधी पक्षांनी आवाज उठवला होता. आता काँग्रेसने पुन्हा एकदा फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचे मालक मार्क झुकेर्बग यांना पत्र लिहून काय कारवाई करणार? असा प्रश्न केला आहे.
या पत्रात काँग्रेसचे सचिव के. सी. वेणूगोपाल यांनी लिहले आहे की, नुकतेच सत्ताधारी भाजप आणि फेसबुक यांच्यातील संबंधाबाबत माहिती पुढे आली आहे. पक्षपातीपणा आणि दोघांमधील देवाणघेवाणीचे काही पुरावेही समोर आले आहेत. देशातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या प्रकरणी काय कारवाई करणार आहात? तसेच या प्रकरणाचा तपास कसा करणार, याची माहिती द्या.
काँग्रेस या प्रकरणी कायदेमंडळ आणि न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही काँग्रेसने फेसबुकला पत्रात दिला आहे. एका परदेशी खासगी कंपनीच्या नफ्यासाठी देशातील सामाजिक एकोपा नष्ट होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
टाईम्स मासिकातही फेसबुकच्या एका बैठकीबाबत खुलासा करण्यात आला आहे. जेव्हा कर्मचाऱ्यांनी भाजप नेत्याची तिरस्कारयुक्त पोस्टबद्दल माहिती दिली, तेव्हा कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी बैठकीतून निघून गेले, असे मासिकाने म्हटले आहे. भाजप आणि फेसबुकमधील बेकायदेशीर संबध आता सर्वांपुढे येत आहेत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेतही म्हटले आहे.