नवी दिल्ली - महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. त्यावरून सोमवारी राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या केली, असा घणाघाती आरोप राहुल गांधी भाजपवर केला आहे.
सोमवारी सकाळी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवसाचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यावेळी काँग्रेसकडून संसदेत जोरदार निदर्शने करण्यात आली. याचबरोबर सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा केली आहे. यावेळी राहुल यांनी महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरून केंद्र सरकारवर टीका केली. 'मला सभागृहामध्ये काही प्रश्न विचारायचे होते. मात्र त्याला आता काही अर्थ राहिला नाही. कारण महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे', असे राहुल गांधी म्हणाले. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाज तहकूब केले होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीला कौल दिला होता. मात्र, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, शनिवारी सकाळी अचानक भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.