नवी दिल्ली - काँग्रेसचे वरिष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन झाले आहे. प्रकृती बिघडल्यानंतर मोतीलाल व्होरा यांना अस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ते 93 वर्षांचे होते. विशेष म्हणजे कालच त्यांचा वाढदिवस होता. व्होरा यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.
रविवारी (20 डिसेंबर) रोजीच त्यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केली होती. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व्होरा यांचा जन्म 20 डिसेंबर 1928 रोजी झाला होता. व्होरा दोन वेळा (1985 ते 1988 आणि जानेवारी 1989 ते डिसेंबर 1989) पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.
मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले -
मोतीलाल व्होरा 1972 ते 1990 पर्यंत सहावेळा मध्य प्रदेशमध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 1993 ते 1996 पर्यंत उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. 1998 मध्ये व्होरा १२ व्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
सलग १८ वर्षे कोषाध्यक्ष -
अनेक वर्षे काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदी राहिले. मोतीलाल व्होरा सन २००० ते २०१८ पर्यंत सलग काँग्रेसचे कोषाध्यक्ष राहिले आहेत. मोतीलाल व्होरा यांनी मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद तर उत्तरप्रदेशचे राज्यपालपद भूषविले आहे.
भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही मोतीलाल व्होरा यांच्या निधनावर दु;ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे, की काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी राज्यसभा खासदार मोतीलाल व्होरा यांच्या निधनामुळे मला दु;ख झाले आहे. परमेश्वर चरणी प्रार्थना आहे, की त्यांच्या आत्म्त्याला शांती मिळो तसेच त्यांच्या कुटुंबाला हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो.
समाजवादी पक्षापासून राजकारणाची सुरूवात -
व्होरा 1968 मध्ये समाजवादी पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर ते दुर्ग म्युनिसिपल कमेटीचे सदस्य बनले. 1972 मध्ये त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली व आमदार बनले. त्यावेळी ते अर्जुन सिंह यांच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशचे शिक्षण मंत्री बनले.
काँग्रेस नेते व छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मोतीलाल व्होरा यांच्या निधनावर दु;ख व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे, की स्थानिक पातळीवरून राजकारण सुरू करून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. आजीवन ते एक निष्ठावान काँग्रेसी राहिले. त्यांच्या निधनाने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधींनी ट्वीट करताना लिहिले आहे, की मोतीलाल व्होरा यांच्या निधनाने काँग्रेस पक्षातील प्रत्येक नेता व प्रत्येक कार्यकर्त्याला व्यक्तिगत दुःख झाले आहे. ते काँग्रेस विचारधारेच्या प्रति निष्ठा, समर्पण आणि धैर्याचे प्रतीक होते. वयाच्या 92 व्या वर्षीही पक्षाच्या सर्व बैठकींमध्ये त्यांची उपस्थिती असायची. अतिशय दु:खी अंतकरणाने त्यांना निरोप देताना वाटत आहे, की कुटुंबातील एक बुजुर्ग सदस्य गमावला आहे.
काँग्रेसने ट्वीट केले आहे, की काँग्रेस परिवारातील वरिष्ठ सदस्य व माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांना सादर श्रद्धांजली. केंद्रीय मंत्री ते मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पदी असताना जनहित हेच व्होरा यांच्या जीवनाचा उद्देश्य राहिला. काँग्रेसशी असणारा त्यांचा स्नेह, निष्ठा व समर्पण कायम आठवणीत राहील.