तिरुवअनंतपुरम - सोेने तस्करी प्रकरणावरून केरळमधील पिनराई विजयन सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. या प्रकरणात विजयन यांचे माजी मुख्य सचिव आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव एम. शिवशंकर यांचेही नाव समोर येत आहे. कारण मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश यांच्याशी या अधिकाऱ्यांचे संबंध होते. आता आणखी एक नाव या प्रकरणात समोर येत आहे.
आरोपी स्वप्ना आणि संदिप नायर यांना केरळमधून बंगळुरुला पळून जाण्यासाठी अलपुझ्झा जिल्ह्यातील किरण नावाच्या तरुण व्यावसायिकाने मदत केल्याचा आरोप काँग्रेस खासदार बेन्नी बेहनान यांनी केला आहे. किरणचे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांशी संबंध होते. त्याच्या घरामध्ये नेते अनेक वेळा भेटायचे. कोणत्या नेत्यांनी किरण याच्या घरी भेट दिली, हे तपासात उघड होईल, असे बेहनान यांनी म्हटले आहे.
आरोपींना मदत केल्याप्रकरणी काँँग्रेसनेदेखील किरण या व्यावसायिकाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मात्र, हे सर्व आरोेप किरण याने बिनबुडाचे असल्याचे म्हणत फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात येत आहे. मुख्य आरोपी स्वप्ना आणि संदिप यांना 24 जुलैपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
दुबईवरून विमानाद्वारे केरळात आणण्यात आलेल्या राजनैतिक सामानात 30 किलो सोने आढळून आले होते. या सोन्याची तस्करी राजनैतिक अधिकाऱ्य़ांच्या संरक्षणाखाली करण्यात येत होती. कारण राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली जात नाही. या तस्करी प्रकरणी युएई कौन्सलेट विभागाचा माजी कर्मचारी पी. एस सारीथ याला सीमा शुल्क विभागाने 5 जुलैला अटक केली होती. या प्रकरणी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचे तपासात उघड होत आहे. आरोपी स्वप्ना आणि संदिप नायर यांना बंगळुरातून अटक करण्यात आली आहे.