पणजी - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत असलेल्या उद्योग संवर्धन व आंतरिक व्यापार विभाग (डीपीआयआयटी) आणि गोवा सरकारच्या सहकार्याने दुसऱ्या 'स्टार्ट अप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट'चे आयोजन करण्यात आले होते. "अशी परिषद फार महत्तवाची असते. त्यानिमित्ताने गुंतवणूकदार, नियामक आणि धोरणकर्ते यांच्यामध्ये संपर्क साधला जातो. स्टार्ट अपमध्ये भारत जागतिक पातळीवर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे असे संवाद होणे अनिवार्य आहे", असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी यावेळी केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी परिषदेच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा केली. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना गोव्याची संस्कृती, कार्यपद्धती आणि पायाभूत सुविधांची ओळख होईल, असे ते यावेळी म्हणाले. डीपीआयआयटीचे सचिव डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांनी परिषदेची संकल्पना विशद केली. स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये गुंतवणूक करण्यासाठी भारतीय बाजारपेठ अतिशय योग्य असल्याचे डॉ. महापात्रा म्हणाले. सरकारने स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी बरेच नियमन अडथळे दूर केले आहेत. तसेच सरकारने राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - गोव्यात एक दिवसीय उर्दू विकास परिषदेचे आयोजन
दिवसभर चाललेल्या या परिषदेत विविध विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात 'नियम सक्षम करून गुंतवणूकीच्या संधी वाढवणे' या परिसंवादात टाटा ऑपर्च्युनिटीज फंडचे पद्मनाभ सिन्हा, इन्वेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक बागला, आयरिन कॅपिटल आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहन दास पै, सिडीबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार, सेबीचे कार्यकारी संचालक एस. व्ही. मुरलीधर राव, भारतीय रिझर्व बँकेचे कार्यकारी संचालक गणेश कुमार यांचा सहभाग होता.
या परिषदेत 10 देशांमधील आघाडीच्या कंपन्या तसेच स्टार्टअप्सच्या 350 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'व्हेंचर कँपिटल इकोसिस्टीम अहवाल-2019' चे प्रकाशन करण्यात आले. या परिषदेत ई-मोबिलीटी, फिनटेक, मेडटेक, एंटरप्राइज सॉफ्टवेअर, एडटेक, जीनोमिक्स आणि लाईफसायन्सेस या क्षेत्रांमध्ये गुंतवणूकीबद्दल प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.