चेन्नई- तामिळनाडूतील कोईम्बतूर वन विभागातील सिरुमुगाई फॉरेस्ट रेंजमध्ये एक मृत हत्तीण आढळून आली आहे. केरळ आणि छत्तीसगडमधील हत्तींच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच तामिळनाडूत आणखी एका वन्य प्राण्याचा मृत्यू समोर आला आहे.
मोलाईयोर ते माईलमोक्काई या जंगल परिसरात वनविभागाचे पथक गस्त घालत असताना त्यांना कुजलेल्या प्राण्याचा वास आला. परिसरात शोध घेतला असता त्यांना अनेक हत्ती एका ठिकाणी जमलेले दिसले, त्यामुळे गस्त पथक माघारी आले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असताना त्यांना मृत हत्तीण आढळून आली. हत्तीण पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होती, तसेच हाडांचा सांगाडा शिल्लक राहीला होता.
गस्त पथकाने तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. 8 ते 10 दिवसांपूर्वीच हत्तीणीचा मृत्यू झाल्याचे पशूवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले. या हत्तीणीचे वय 47 ते 49 च्या दरम्यान असावे. संपूर्ण शरीर कुजल्यामुळे मृत्यू कशाने झाला याचा अंदाज डॉक्टरांना घेता आला नाही. त्यामुळे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
यावर्षी जानेवारी ते जूनपर्यंत कोईम्बतूर वनविभागात 10 हत्तींचा मृत्यू झाला आहे. यातील 6 हत्तींचा मृत्यू एकट्या सिरूमुगाई वनविभागात झाला आहे.