कोईम्बतूर - कोरोनाचा प्रसार झाल्याने देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात पुरेसा वेळ मिळाल्याने तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील एका 16 वर्षीय मुलाने व्हॉटसअॅपसारखेच एक अॅप तयार केले आहे. 'सेक्यूर मेसेंजर ' असे त्याच्या अँड्रॉईड अॅपलिकेशन्सचे नाव आहे.
संजय कुमार असे या मुलाचे नाव आहे. त्याने हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर सुद्धा अपलोड केले आहे. तो रामनाथपूरम येथील रहिवासी असून 12 वी चे शिक्षण घेत आहे. हे अॅप व्हॉटसअॅपसारखेच असून यामध्ये व्हिडीओ कॉल, स्टीकर, ग्रुप चॅट असे फिचर आहेत. हे अॅप तयार करण्यास त्याला 45 दिवसांचा कालावधी लागला.
सगळीकडेच बोलबाला असलेल्या चिनी अॅपवर भारत सरकारने बंदी आणली आहे. या बंदीनंतर भारतीय अॅप आता बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि आत्मनिर्भर बना, असा संदेश दिला आहे. यामागे देशातील अॅप तंत्रज्ञानाला देखील प्रोत्साहन देणे, हा हेतू आहे.