डेहराडून - प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अचानक हिंसक वळण लागले. यात 300 पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या आंदोलनावरील विधानाने एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी जे हिंसक आंदोलन केले. त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी हिंसक आंदोलनाला काँग्रेसे आंदोलन असा करार दिला. या हिंसक आंदोलनात सीएए आणि जीएसटीचा विरोध करणारे लोकांचा समावेश आहे. या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर येत आहेत, असे ते म्हणाले. तसेच त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचा बचाव केला. शेतकऱ्यांनी हे हिंसक आंदोलन केले नाही. शेतकरी आपल्या मातीशी इमान राखतात. हे काम काही अराजकता पसरवणाऱ्या लोकांनी केले असून ही योजना त्यांनी आधीच आखली होती, असे रावत म्हणाले.
काय प्रकरण ?
प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यात घुसून शेतकऱ्यांच्या काही गटाने आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर चढाई करून किल्ल्याच्या घुमटावर निशाण ए साहिब ध्वज फडकावला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. आंदोलक मागे हटत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे.