नवी दिल्ली : दिल्लीच्या सिंघू सीमेवर असलेल्या गुरू गोविंद सिंह स्मारकाला रविवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भेट दिली. यावेळी त्यांना आंदोलक शेतकऱ्यांचीही भेट घेतली. तसेच, कीर्तनाच्या कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवली. याठिकाणी बोलताना केंद्र सरकारने कृषी कायदे तातडीने मागे घ्यावेत अशी मागणी केजरीवाल यांनी याठिकाणी बोलताना केली.
दिल्ली सरकारच्या पंजाब अकादमीने याठिकाणी कीर्तनाचे आयोजन केले होते. या अकादमीचे चेअरमन हे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आहेत. याठिकाणी उपस्थिती दर्शवत केजरीवाल आणि सिसोदिया यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्येही सहभाग नोंदवला. तर सीमेवरील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री अरविंद हे स्वतः ठिकठिकाणी जाऊन त्याबाबतच्या नियोजनाची पाहणी करत असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.
आंदोलनाचा ३३वा दिवस..
केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज ३३वा दिवस आहे. गेल्या ३२ दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात आणि देशभरातील अन्य ठिकाणचे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून आहेत. केंद्र सरकार तीन कृषी कायदे मागे घेत नाहीत तोपर्यंत आपण दिल्लीच्या सीमा सोडणार नाही अशी भूमीका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. मुख्य ४० शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे ५०० शेतकरी संघटनांमधील शेतकरी याठिकाणी आंदोलन करत आहेत. तसेच या आंदोलनाला काँग्रेससह अन्य १२ विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे.
हेही वाचा : दिल्लीतील आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी सुरू केली शेती..