लडाख - गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवरील तणावानंतर आता चीन लष्काराने एलएसीवरून(प्रत्यक्ष सीमा रेषेवरून) त्याचे तंबू हटवले आहेत. त्यांची वाहनेही सीमारेषेपासून 1 ते 2 किलोमीटर मागे घेतली असल्याची माहिती भारतीय लष्करांच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेमध्ये चिनी लष्कराने माघार घेतली असल्याची माहिती वृत्त संस्थाकडून देण्यात येत आहे. चिनी लष्कराची काही अवजड वाहने अद्यापही गलवान नदीच्या खोऱ्यातच आहेत. मात्र, भारतीय लष्कर त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. १५ जूनला दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती, यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. तर चीनचे ४० जवान मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर सीमेवर तणावाचे वातावरण होते.
चीनच्या सैनिकांनी गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घुसखोरी केली होती. त्यानंतर भारताने देखील या भागातील फौजफाटा वाढवला होता. दोन्ही देशांच्या लष्करांच्या कंमाडर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या तीन बैठका पार पडल्या. त्यानंतर गलावान खोऱ्यातून माघार घेण्याबाबत सहमती झाली.