नवी दिल्ली - लडाख येथील सीमा प्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये गेले काही दिवस संघर्ष सुरू होता. यावर दोन्ही देशांमध्ये बोलणी सुरू असताना, चीनने गॅलव्हान नाला भागातील सैन्याची तुकडी काही अंतर मागे घेतली आहे. गेल्या एक महिन्यापासून सीमा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात होता.
गेल्या तीन ते चार दिवसानंतर चीनने आपले सैन्य मागे घेतल्याची ही दिलासादायक बाब समोर येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीकडून कुठलीही हालचाल झालेली नाही. ते सध्या ‘अॅक्चुअल कंट्रोल लाइन'च्या आसपास आहेत. चीनच्या हवाई दलाकडून पूर्व लडाख भागात फायटर विमाने उडवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान बोलणी सुरू आहेत.
भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोलणी झाली आहे. चीनने 5 हजार सैन्य ‘अॅक्चुअल कंट्रोल लाइन'वर (एलएसी) पाठवले होते. त्यावेळी भारताच्या सीमेत घुसखोरी करण्यात आली.
उपग्रह आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारत लक्ष ठेवून आहे. तसेच चीनने एलएसीच्या जवळ इमारती उभा करण्याचे काम सुरू केले आहे. यावरही आम्ही लक्ष देऊन असल्याचे भारतीय लष्कर अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताकडूनही एलएसीच्या बाजूने रस्त्यांचे काम सुरू केले आहे. हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन करत आहे.