बिजिंग - भारताने काल (सोमवार) देशाच्या आणि नागरिकांच्या माहितीच्या सुरक्षेचे कारण देत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. यामध्ये भारतात लोकप्रिय झालेल्या शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचाही समावेश आहे. चीनने भारताच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. भारतातील चिनी गुंतवणूकदारांच्या कायदेशीर आणि वैधानिक हक्कांची जबाबदारी भारताची असल्याचे चीनने म्हटले आहे.
या चिनी अॅपमुळे भारतीयांच्या गोपनीय माहितीला धोका आहे. भारताच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धोका आहे. काही अॅप्सवरील नागरिकांची माहिती भारतात सर्व्हर नसलेल्या ठिकाणी पाठवत आहे. यासंबधी अनेक तक्रारी दाखल झाल्याने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या अॅप्सवर बंदी घातली आहे. टिकटॉक, हॅलो, युसी ब्राऊजर, कॅमस्कॅनर, क्लब फॅक्टरी यांचा बंदी घालण्यात आलेल्या अॅप्समध्ये समावेश आहे.
भारत-चीन सीमा वाद सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व लडाखमध्ये सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीत 20 भारतीय जवान हुतात्मा झाले. तसेच सीमेवरील इतर अनेक ठिकाणी परिस्थिती तणावपूर्व बनली आहे. भारताच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांत तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
भारत सरकारने जारी केलेल्या नोटीसीवरून चीन चिंतेत आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नियम, स्थानिक कायदे आणि नियमांशी चिनी उद्योगांनी बांधील रहावे, यावर चीनने कायमच भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणुकदारांच्या वैधानिक आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. यात चिनी गुंतवणूदारांचाही समावेश होतो, असे लिजिन म्हणाले.
भारतीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनुच्छेद 69 ए नुसार कारवाई करत 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली. भारताच्या एकात्मतेसाठी आणि सार्वभौमत्वासाठी ही अॅप पुर्वग्रहदुषित असल्याचे मंत्रालयाने म्हटले. अवैध कारवायांमध्ये या कंपन्या गुंतल्या असल्याचे म्हणत 59 अॅप्सवर बंदी घातली. हा निर्णय भारताच्या मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचा आहे. तसेच यामुळे भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा होईल, असे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले.