लखनौ - उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधील एका सरकारी शाळेत, मध्यान्न भोजनामध्ये चक्क मीठ आणि चपाती दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे, या शालेय पोषण आहारामध्ये 'पोषण' कुठे आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
'ईटीव्ही भारत'शी बोलताना एका विद्यार्थ्याच्या पालकाने सांगितले, की गेल्या वर्षभरापासून मुलांना फक्त मीठ-चपाती किंवा मीठ-भात दिला जात आहे. क्वचित कधीतरी दूध आणि केळी दिली जातात.
ईटीव्ही भारतच्या वृत्तानंतर, जिल्हाधिकारी अनुराग पटेल यांनी घटनेची पडताळणी केली. त्यानंतर, त्यांनी चौकशीचे आदेश दिले. दुर्दैवाने झालेली घटना ही खरी आहे. प्रथमदर्शनी यात पोषण आहारासाठी नियुक्त शिक्षक मुरारी आणि ग्रामपंचायत अधिकारी अरविंद त्रिपाठी यांचा दोष असल्याचे आढळून आले आहे. या दोघांनाही बडतर्फ करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
शाळकरी मुलांना पूरक आहार आणि पुरेसे पोषण मिळावे म्हणून, शालेय पोषण आहार दिला जातो. या आहारामध्ये कडधान्ये, भात, चपाती आणि वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असावा असे निर्देश आहेत. शिवाय ठराविक दिवशी दूध आणि फळांचादेखील समावेश असावा. मात्र, या निर्देशांचे पालन होताना दिसत नाही.