शिमला - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश राज्यातील अटल रोहतांग बोगद्याचे उद्धाटन केले. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि अनेक आमदार, खासदार उपस्थित होते. मात्र, यातील एका आमदाराच्या निष्काळजीपणामुळे मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसह कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण?
हिमाचल प्रदेशमधील कुलू जिल्ह्यातील बंजारा विधानसभा मतदारसंघातील आमदार सुरेंद्र शौरी यांनी १ ऑक्टोबरला कोरोना चाचणीसाठी नमुना (स्वॅब) दिला होता. तर २ ऑक्टोबरला त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. हा अहवाल येण्याआधीच शौरी सोलंगनाला कार्यक्रम स्थळी आले होते. तेथे ३ ऑक्टोबरला पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासह अनेक मंत्री कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेले आमदार सर्वांच्या संपर्कात आले.
आमदाराचा हलगर्जीपणा
आमदार सुरेंद्र शौरी यांनी १ ऑक्टोबरला चाचणीसाठी नमुना दिल्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासंबंधीच्या नियमावलीचे पालन करायला हवे होते. मात्र, अहवाल येण्याच्या आधीच शौरी कार्यक्रमस्थळी पोहचले. त्यामुळे तेथील अनेक अधिकारी आणि नेत्यांच्या संपर्कात आल्याने सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. यावेळी शौरी यांना कोरोना झाल्याचे माहीत नव्हते. मात्र, कोरोना नियमावलीचे पालन करणे गरजेचे होते. यात त्यांनी निष्काळजीपणा केल्याने पंतप्रधान मोदींनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री, पंतप्रधानांना कोरोनाचा धोका
अटल बोगद्याच्या उद्धाटनानंतर शिमल्याला पोहोचल्यानंतर हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्वत:ला क्वारंटाइन (अलगीकरण) केले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि मंत्री मंडळातील राकेश पठानिया हे सुरेंद्र शौरींच्या संपर्कात आले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. तर ३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री पंतप्रधानांसह इतर नेत्यांच्या संपर्कात आले.
निष्काळजीपणा करणाऱ्या आमदारावर होणार कारवाई?
एका जबाबदार लोकप्रतिनिधीमुळे मुख्यमंत्री, पंतप्रधानांसह सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण झाला. त्यामुळे आमदाराच्या बेजबाबदार वर्तनावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कोरोना नियमावलीनुसार संसर्गाची लक्षणे दिसल्यानंतर तसेच नमुना दिल्यानंतर स्वत:चे अलगीकरण करून घेणे अनिवार्य आहे. मात्र, निष्काळजीपणामुळे कार्यक्रमास उपस्थित सर्वांना क्वारंटाइन व्हायची वेळ आली. त्यामुळे या आमदारावर कारवाई होणार की नाही? हे लवकरच कळेल. सर्वसामान्य नागरिकांना कोरोना नियमावलीचे पालन केले नाही तर, प्रसंगी पोलिसांचा प्रसादही मिळतो. मात्र, लोकप्रनिधींवर काय कारवाई होणार, हा प्रश्न आहे.